उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर):- कोरपनातालुक्यातील सोनुर्ली गावामधे अनेक दिसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा महापूर सुरू असल्याने याकडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,पदाधिकारी,सदस्य व गावातील महिला वर्ग यांनी पुढाकार घेऊन कोरपना पोलीस ठाण्यात धडक देताच अवैधरीत्या चालणारी दारू विक्री बंद करण्यात आली होती.मात्र हल्ली सोनुर्ली गावामध्ये अवैध दारू विक्री खुलेआम व अती जोमाने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले आहे. अशातच अनेकजण दारूच्या आहारी जाऊन अनेकांची संसारे उध्वस्त होतांना दिसून येत आहेत.मात्र याचे कुणाला ‘ना सुतक ना बारसा’ असे दिसून येत असल्याने गावातील महिला वर्ग,पुरुष वर्ग, प्रतिष्ठित नागरिक व इतर मान्यवरांनी एकत्र येऊन अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी; अशी मागणी केली आहे.