उद्रेक न्युज वृत्त
भंडारा(लाखनी):- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथील शेतकरी रामकृष्ण नारायण लुटे यांच्या बाबतीत एक अनोखा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.वारंवार पिएम किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरूनही अपात्र ठरविण्यामागचे कारण उघडकीस आल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.
लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथील शेतकरी रामकृष्ण नारायण लुटे यांच्याकडे जेमतेम बोटावर मोजण्या इतकी अर्धा एकर शेती आहे.केंद्राच्या पिएम किसान योजने अंतर्गत वर्षाकाठी ६ हजार रुपयांचे शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य दिले जाते.यासाठी लुटे यांनी वारंवार गत तीन वर्षे फॉर्म भरूनही अपात्र ठरविण्यात येत आहे.संबंधित शेतकरी अर्थसहाय्यासाठी शासन दरबदारी उंबरठे झिजवित आहे.शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या आधारलिंक असलेल्या बँक खात्यात शासनाकडून आलेली रक्कम जमा करण्याचे काम तालुका प्रशासनाकडून कडून करण्यात येते.मात्र पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून एक रूपयासुद्धा त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.जमा न होण्या मागचे कारण व अपात्र ठरविण्यामागचे कारण म्हणजे तालका व महसूल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे योजनेचा लाभार्थी ठरू शकणारा शेतकरी जिवंत असताना त्यांना मयत दाखविले जाते आहे.त्यामुळे योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.
रामकृष्ण लुटे,अल्पभूधारक शेतकरी,सिपेवाड👇
साहेब मी जिवंत आहे! मात्र,मला मयत झाल्याचे दाखवून नेहमीच योजने पासून वंचित ठेवले जात आहे.माझ्याकडे फक्त अर्धा एकर शेतजमिन आहे.मी अनेकदा तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला.मी जिवंत असल्याचा दाखला सोबत घेऊन फिरतोय,पण मला रूपयाचाही सन्मान मिळाला नाही.