उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात धान कापणीला सुरुवात झाली आहे.त्यानुसार शेतकरी बांधव शेतातील पाणी निचरा वा झालेले धान कापणी करीता महिला वर्गांना पाचारण करून शेतातील कामे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.अशातच देसाईगंज व आरमोरी तालुक्यात हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.एक दिवसा आड वन्य प्राणी व मानवी संघर्ष होतांना दिसून येत आहेत.असाच प्रकार आज दिनांक – १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात; काळागोटा येथील सात ते आठ महिला आज शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला; सदर वाघाने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे अंदाजे वय ६० वर्षे यांना वाघाने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला; सहकारी महिलांनी आरडा-ओरड करून महिलेची सुटका तर केली; मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली.सदर घटनेची माहिती मिळताच आरमोरी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला.