नवी दिल्ली :- यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मुख्य व्यासपीठासमोर आगळेवेगळे व्हीआयपी असणार आहेत.यंदा या रांगेत भाजी विक्रेते, रिक्षाचालक,बांधकाम मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदराने आमंत्रित करण्यात आले आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे सूत्र सर्वसामान्यांचा सहभाग हे असणार आहे.त्यामुळेच श्रमजीवीवर्गाला मानाच्या रांगेत बसून जगविख्यात असे पथसंचलन बघण्याचा आनंद घेता येणार आहे.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राजपथचे ‘कर्तव्य पथ’ झाल्यानंतरचा हा पहिलाच सोहळा असणार आहे. मुख्य व्यासपीठासमोर नेहमी व्हीआयपी मंडळींसाठी विशेष रांग असते.त्यात देश-विदेशातील व्हीआयपी असतात.यंदा त्यांच्या जागी रिक्षाचालक,भाजी विक्रेते, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी दिवसरात्र राबलेले मजूर, छोटे दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या व्हीआयपी रांगेत बसण्याचा मान देण्यात आला आहे. यंदाच्या संचलनासाठी आसन व्यवस्था घटवून ४५ हजार करण्यात आली आहे.त्यापैकी ३२ हजार आसनांचे ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधाही देण्यात आली
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सिसी यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.मुख्य संचलनातही यंदा इजिप्तचे १२० जवानांचे पथक सहभागी होणार आहे.