उद्रेक न्युज वृत्त
भंडारा(लाखांदूर) :- शेतकरी बांधवांच्या व्यथा कोण ऐकणार? कधी सततची नापिकी,अवकाळी पाऊस,गारपीट, किडीचा प्रादुर्भाव,मालाला योग्य हमीभाव नाही,बँकांचे कर्जाचे डोंगर व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच चालले जात आहे.अशाच प्रकारे लाखांदूर तालुक्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शेतशिवारातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अनुक्रमे शुक्रवारी व शनिवारी घडली.असल्याने दोन्ही गावात शेतकरी आत्महत्या मुळे शोककळा पसरली आहे.
सुधाकर लक्ष्मण मेश्राम वय ६२ वर्षे रा. पिंपळगाव कोहळ, सारंगधर विठोबा मेश्राम वय ६० रा.किरमटी अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.१७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सुधाकर मेश्राम यांनी दोन वर्षापासूनची नापिकी व कर्जाच्या तणावातून शेतशिवारातील झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.सुधाकर यांच्या नावे पावणे दोन एकर शेती असून सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती आहे.तर दुसऱ्या घटनेत किरमटी येथे घरासाठी घेतलेले कर्ज फेडणे डोईजड झाल्याने शनिवारी १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सारंगधर विठोबा मेश्राम याने शेतशिवारात फणसाच्या झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.पोलिस सूत्रानुसार,त्यांच्यावर खासगी फायनान्स कंपनीचे १ लाख ३० हजार रुपयांचे व इतर खासगी कर्ज असल्याची माहिती आहे.