उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- शहराला लागून आरमोरी मार्गे असलेल्या जैव विविधता उद्यान वनविभाग बाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून सदर घाणीतून उद्यानामध्ये व परिसरात सर्वत्र दुर्गंधी येऊ लागली आहे.दुर्गंधीमुळे जैव विविधता उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अशातच दुर्गंधीच्या त्रासापायी जैव विविधता उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने यावर देसाईगंज नगरपरिषदेने त्वरित व वेळीच उपाययोजना करण्यात यावी; यासंदर्भात वडसाचे वनपाल आर.के.घुटके यांनी आज २० एप्रिल रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना पत्र सादर करून लक्ष वेधले आहे.
देसाईगंज येथील जैव विविधता उद्यानामध्ये चंद्रपूर,भंडारा,गोंदिया व इतर जिल्ह्यातील पर्यटक भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटीत असतात. त्याचप्रमाणे इतर माहिती संकलित करून महत्व जाणून घेतात.मात्र देसाईगंज नगर परिषदेचा शहरातील संपूर्ण कुडा-कचरा जमा करून जैव विविधता उद्यान परिसराच्या बाजूला आणून टाकला जात असल्याने कचरा व इतर टाकाऊ वस्तूंचे ढीग तयार होऊन त्यातून दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे अशी दुर्गंधी पसरू नये व उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये; याकरिता पर्यायी व्यवस्था करून तात्काळ कचऱ्याची विल्हेवाट लावावी.असे वनपाल आर.के.घुटके यांनी पत्ररुपी लक्षवेधी मागणी केली आहे.