- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.प्रकरणी परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागास दिली.माहिती मिळताच वनाधिकारी तसेच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पाहणी दरम्यान मादी वाघ असल्याचे निष्पन्न झाले. वाघीण जखमी असल्याने मार्गावर निपचित पडली होती. जखमी वाघिणीला पुढील उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले.रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वाघाला धडक मारली असावी,असा कयास बांधला जात होता. अश्यातच आता जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.विशेष म्हणजे,१५ महिन्यांच्या या अवयस्क मादी वाघिणीला कमरेखालील भागाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मागील भाग पूर्णपणे निकामी झाला होता.अकाली मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.पवनी वनपरिक्षेत्र हा उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा अत्यंत संवेदनशील कॉरिडॉर आहे.अशा संवेदनशील क्षेत्रात वाघिणीच्या बचाव कार्यात तब्बल चार तासांचा विलंब होणे,ही बाब वन विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.बचाव पथकाकडे पिंजरा उपलब्ध नव्हता,त्यामुळे नवेगाव बांध येथून पिंजरा मागवण्यासाठी चार तास लागले.गंभीर जखमी वाघिणीला तातडीच्या उपचाराची आवश्यकता असतांना झालेला हा विलंबच तिच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले आहे,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
- Advertisement -

