उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- कोरपना पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे यांनी ८ जून रोजी पोलिस ठाण्यात विपुल मुनावत नामक २८ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण केली.याबाबत गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची आज,१० जून रोजी भेट घेत त्यांच्याकडे ठाणेदार एकाडे यांची तक्रार केली.
कोरपना तालुक्यातील तांडा क्रमांक-१ मध्ये ठाणेदार एकाडे हे पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत रमेश मुनावत यांच्या घरी अवैध दारू असल्याच्या संशयावरून गेले होते.त्यावेळी घरी अल्पवयीन मुलगी होती.रमेश मुनावत यांचे पुतणे विपुल मुनावत यांनी ठाणेदार यांना सांगितले की,घरी कुणी नाही.त्यानंतर ठाणेदार यांनी विपुलच्या घरी दारूचा शोध घेतला; मात्र हाती काहीही लागले नाही.त्यावेळी ठाणेदार एकाडे यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून विपुलला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले. त्यानुसार विपुल ८ जून रोजी पोलिस स्टेशनमध्ये गेला.
त्यावेळी ठाणेदार एकाडे यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्याच्या हाता-पायासह पाठीवर पट्ट्याने मारहाण केली.विशेष म्हणजे मारहाण करताना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे हे ‘कांटा लगा गाणे म्हणत’ मारहाण करीत होते; अशी ऑडिओ क्लिप पुढे आली आहे.विपुल ठाणेदार याला विनवणी करीत होता.मात्र त्याचे काही न ऐकता अमानुष मारहाण सुरू होती.तू दवाखान्यात गेला तर पुन्हा मारणार अशी धमकीही ठाणेदार यांनी यावेळी दिली.मात्र गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी आज,१० जून रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतठाणेदार एकाडे यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

