उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने चक्क आजीचा कानच तोडल्याची घटना दोन वर्षभरापूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील राळेगावात घडली होती.याप्रकरणी गोंडपिपरी तालुका न्यायालयाने बुधवारी निकाल देत नातवाला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजारांचा दंड ठोठावला.राहुल देठे असे आरोपी नातवाचे नाव आहे.राहुलला दारूचे व्यसन आहे.आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलब आली.पण खिशात पैसे नव्हते.अशावेळी तो आपली आजी बुधाबाई रायपुरे ८० यांच्या घरी गेला.दारूसाठी पैशांची मागणी केली, पण पैसे देण्यास आजीने नकार दिला.त्याला आजीच्या कानात सोन्याची बिरी दिसली. त्याने जबरदस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी खेचून पळ काढला.या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आजीने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी कलम ३२७ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला.ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वसंत कोसनशिले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायाधीशांनी पुरावे तपासून आरोपी राहुलला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.सरकारी वकील म्हणून ॲड.राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.