उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केला असल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी घडली.होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अंजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला.हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले.यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर मृतदेह ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने,तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले.काहींनी वैनगंगा नदीच्या पाण्याचा उडी घेतली.परंतु, बराच वेळ मधमाश्यांनी पिच्छा सोडला नव्हता.त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.यात ३० नागरिक किरकोळ जखमी झाले, तर पाच नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे.मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते 30 नागरिक किरकोळ जखमी झाले.गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे.ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण,सुशीला बनसोड,सुभाष चव्हाण, शुभम रामटेके,घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्या आले.मधमाश्यांचा हल्ला थांबल्यानंत मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारा मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.