- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच परत आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला,तर पाठीमागे बसलेली दुचाकीवरील पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना देसाईगंज-आरमोरी मार्गावरील जेजानी पेपर मिल कारखान्याजवळ घडली.विशेष म्हणजे,तरुणाचा अपघात ज्या ठिकाणी झाला होता,त्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावरच सदरचा अपघात घडला.
चंद्रहास मेश्राम वय ३७ वर्षे,रा.आरमोरी,ता.आरमोरी, जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर ममता चंद्रहास मेश्राम असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,चंद्रहास मेश्राम व त्यांची पत्नी ममता हे दोघेही आज सायंकाळच्या सुमारास एमएच ३३ बी ६७२२ क्रमांकाच्या दुचाकीने भंडारावरून त्यांच्या गावी आरमोरीला जाण्यासाठी निघाले होते.दरम्यान, दुचाकीने देसाईगंज शहरापासून आरमोरी मार्गे काही अंतरावर येताच जेजानी पेपर मिल कारखान्याजवळ आरमोरीवरून देसाईगंज मार्गे जाणाऱ्या एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.धडक इतकी भीषण होती की,दोघेही पती-पत्नी दूरवर फेकल्या जाऊन मुख्य मार्गावरच कोसळले.यात चंद्रहास मेश्राम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर ममता मेश्राम यांचा एक हात मोडला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते जसपाल सिंग चावला यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले व दोघांनाही देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी अंती चंद्रहास मेश्राम यांना मृत घोषित केले.तर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

