उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथील सुनीता नरेंद्र शेंडे वय ३२ वर्षे या महिलेच्या पोटात तीव्र त्रास सुरू झाल्यामुळे तिला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आकाश डोंगरावर यांनी तिची तपासणी करून उपचार सुरू केले.नंतर त्यांनी तिला सोनोग्राफी काढण्याचा सल्ला दिला.सोनोग्राफीनंतर गर्भाशयाच्या फायब्रॉइडवर सुजन असल्याचे समजले. त्याकरिता मोठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. उपजिल्हा रुग्णालय स्तरावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया शक्य नव्हती.परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके यांच्या मार्गदर्शनात डॉ.आकाश डोंगरवार यांनी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे सदर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजित केले.त्यासाठी रक्ताची जुळवा-जुळव करून बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. स्वप्नील मेश्राम यांच्या मदतीने रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू केली.तब्बल दोन तास चाललेल्या शस्त्रक्रिये दरम्यान महिलेच्या गर्भशयातून दीड किलो मासाचा गोळा काढण्यात आला.एवढी मोठी व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके यांनी सांगितले.
.

