- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रवाशांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट
कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. प्रवाशांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी
कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे.त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या संबंधित प्रवाशांनी प्रवासाच्या वेळी एनसीएमसी कार्ड सोबत ठेवावे,तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप करून ठेवावी,असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९०० नागरिकांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे.
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रवासातील विविध सवलतींसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी ५० टक्के सवलत,६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना मिळणारी ५० टक्के सूट आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी असणारा शंभर टक्के मोफत प्रवास यांचा समावेश आहे.७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’ना कार्डची सक्ती करण्यात काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे.या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीदरम्यान हाताचे ठसे न उमटणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत.त्यामुळे त्यांच्यासाठी कार्डची सक्ती तत्काळ लागू करण्यात आलेली नाही.संबंधित प्रवाशांना सवलतीचे तिकीट कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे.कार्डची नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या कार्डची नोंदणी व वितरण सुरू आहे.त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यात येणार आहे.
- Advertisement -

