उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका ३५ वर्षीय तरुणाचा भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार २२ फेब्रुवारीला सकाळी सात वाजेच्या दरम्यान मूल तालुक्याच्या मरेगाव परिसरात घडली. विशेष म्हणजे,तरुण हा दारूच्या नशेत असल्याने तो रस्त्याच्या कडेला झोपलेला असतांनाच सदरची घटना घडली.यात अजय नागोराव नान्हे वय ३५ वर्षे,रा.पेंढरी, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृतक तरुणाचे नाव आहे. अजय नान्हे हा आज सकाळच्या सुमारास दारूच्या नशेत मूल-नागपूर मार्गावरील मरेगाव परिसरात आला. मार्गावरून चालत जात असतांनाच तो रस्त्याच्या कडेला झोपून राहिला.दरम्यान,सिंदेवाहीकडून मूलकडे येत असलेल्या जेएच ०९ बीसी ८३६० क्रमांकाच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपेत असलेल्या अजयला जोरदार धडक दिली.धडक भीषण असल्याने अजयचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती मूल पोलिसांना दिली.लागलीच मूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.प्राथमिक तपासात मृतक तरुण हा दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले असून प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस प्रशासन करीत आहे.

