- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधार लिंक लाभार्थीना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास काल शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली असतांनाच हा हप्ता देण्यासाठी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राखीव असलेला ४१० कोटी रुपयांचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा ३३६ कोटींचा निधी लाडक्या बहिणींकडे वळविण्यात आल्याने नव्याच वादाला तोंड फुटले असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसारित केले आहे.महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सदर रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समाज माध्यमांद्वारे दिली.मात्र,लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आले कुठून याचे उत्तर नव्या वादाला तोंड फोडणारे आहे.
दिलेल्या वृत्तानुसार,राज्य सरकारने २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर आदिवासींच्या विकासासाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी सहाय्यक अनुदान म्हणून ३ हजार ९६० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.यापैकी ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे.आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे.आता या दोन्ही विभागातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे.अनसूचित जाती घटक (एसएसीपी) कार्यक्रमांतर्गत राज्याच्या अनूसूचित जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे व हा निधी त्यांच्या कल्याणासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे.मात्र,तिजोरीत निधीची टंचाई असल्याने राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या कल्याणासाठी राखीव निधीच पळविला आहे.
लाडकी बहिण ही योजना महिला व बाल विकास विभागातर्फे राबविली जाते.या विभागासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या निधीच्या तरतूदीमधूनच लाडक्या बहिणींना दरमहा द्यावयाची मदत दिले जाणे गरजे असतांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेतनेतर सहाय्यक अनुदानांसाठी राखीव ३ हजार ९६० कोटींपैकी ४१० कोटी ३० लाख महिला बाल विकास वळविण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या निधीलाही हात घातला.यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी अन्य विभागाकडे वळविण्याला तीव्र विरोध दर्शविला होता.मात्र,त्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवित राज्य सरकारने हा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविला आहे.मात्र, लाडकी बहीण योजनेचे श्रेय शिरसाट यांचे नेते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिले जात असल्याने शिरसाट यांनाही तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागत आहे.केवळ आक्षेप नोंदवण्यापलीकडे ते काहीही करू शकत नसल्याचे चित्र आहे.
- Advertisement -

