- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गरिबांच्या ताटात जाणारा सरकारी तांदूळ प्रशासकीय उदासीनतेमुळे कसा मातीमोल होतो,याचा प्रत्यय लाखांदूर येथे आला आहे.येथील अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात साठवून ठेवलेला सुमारे ९ हजार क्विंटल तांदूळ खराब गोदामामुळे आणि वेळेवर उचल न झाल्याने सडला आहे.आता हा खराब झालेला तांदूळ चाळणी आणि पॉलिश करण्यासाठी पुन्हा राईस मिलमध्ये पाठवण्याचे काम सुरू असून,यामुळे शासनाला लाखो रुपयांचा भुर्दंड व नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.लाखांदूर तहसीलच्या अन्नपुरवठा विभागामार्फत सीएमआर अंतर्गत नागपूर जिल्ह्याला अंत्योदय आणि बीपीएल लाभार्थ्यांसाठी तांदूळ पुरवठा केला जातो. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भाड्याने घेतलेल्या एका गोदामात ९ हजार क्विंटल तांदूळ साठवण्यात आला होता.मात्र,या गोदामाची स्थिती तांदूळ साठवण्यायोग्य नव्हती.पावसाळ्यात छतातून पाणी गळल्याने आणि जमिनीतील ओलाव्यामुळे तांदळाला बुरशी लागली असून त्यात बारीक पीठ पडले आहे.तांदूळ जेव्हा नागपूर जिल्ह्याला पाठवण्यासाठी बाहेर काढण्यात आला,तेव्हा त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले.खराब दर्जामुळे नागपूरच्या पुरवठा विभागाने हा तांदूळ स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.परिणामी,आता हा तांदूळ लाखांदूर तालुक्यातीलच राईस मिलमध्ये पाठवून त्यावर पुन्हा प्रक्रिया केली जात आहे.
- Advertisement -

