भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात घडून तब्बल आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लाखनी तालुक्याच्या पिंपळगाव सडक गावाजवळील भाऊचा ढाबा जवळ घडली.अपघातातील सर्व मृतक हे छत्तीसगड राज्यातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातात तीन लहान मुले, पाच महिला आणि पुरुषांसह आठ जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.तसेच काहीजण गंभीर जखमी झालेत.
माहितीनुसार,छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने आज नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग-५३ वरून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते.प्रवास करत असतांना पहाटे चारच्या सुमारास पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून एक आयशर ट्रक रस्त्यावर निघत असतांनाच मागेहून येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे अचानकपणे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्समधील आठ जण जागीच गतप्राण झाले.अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.मात्र,पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

