उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मोबाइल ही आजच्या घडीला गरजेची वस्तू झाली आहे.एक वेळ जेवण नसले तर जमेल परंतु, मोबाइल आवश्यक आहे.नेमके हेच हेरून सर्वच कंपन्यांनी रिचार्जचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे.रिचार्ज करून देखील नेटवर्कची समस्या उद्भवत आहे.यामुळे,मोबाइलधारकांची लूट होत आहे.सुरुवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्या नंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये वाढ करून एकप्रकारे ‘व्यसन आणि येसन’ असा प्रकार सुरू झाला आहे.
त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.विशेषतः कोविडमुळे झालेल्या टाळेबंदी पासून मोबाइल आणि ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली आहे.वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थीसुद्धा स्मार्टफोनचा आणि इंटरनेटचा वापर करतात. कार्यालयीन कामासाठी चाकरमान्यांना,शिक्षकांना माहिती टाकण्यासाठी,शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणीसाठी स्मार्टफोन आणि डाटाची गरज भासते. वीजबील दरवाढी पाठोपाठ रिचार्जचे दरही आपसुकच वाढले आहेत.
अलिकडे शेती,शिक्षण,कार्यालयीन कामकाज अशा सर्वच कामांसाठी स्मार्ट मोबाइलचा वापर केला जातो. त्यासाठी इंटरनेट आणि डाटाची गरज भासते.दरम्यान कंपन्यांनी कॉल आणि डाटाचे दर वाढविल्याचा फटका नोकरदारच नव्हे; तर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वच नेटकरी ग्राहकांना बसला आहे.कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे रिचार्ज महाग केले आहेत.हे बदल गुरुवार,दिनांक-४ जुलै पासून लागू झाले आहेत.तिन्ही कंपन्यांनी जिओ,एअरटेल आणि व्होडाफोन यांनी प्लॅन्समध्ये २७ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.देशात कोट्यवधी लोक मोबाइल फोन वापरतात.त्यामध्ये अगदी तळागाळीतील जनतेचाही समावेश आहे.त्यामुळे रिचार्ज प्लॅन दरवाढीचा परिणाम थेट त्यांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.टेलीकॉम कंपन्यांनी मासिक,त्रैमासिक व वार्षिक रिचार्ज प्लानचे दर वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक चणचणीत टाकले आहे.

