उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम ४ जुलैला आयोजित केला होता.यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास मांसाहारी जेवणाचा बेत आखला होता.मात्र,पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या,मळमळ,डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली.त्यानंतर एकच गोंधळ उडाला होता.बारश्याच्या कार्यक्रमात मांसाहारी जेवणातून २८ रुग्णांना विषबाधा झाली होती.यातील २२ बाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.सद्यस्थितीत सर्वांची प्रकृती स्थिर असून,काल,रविवारी सर्वांना सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी दिली आहे.
नामकरण कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झालेल्या २८ बाधितांपैकी ६ जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे तर २२ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते.यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती होती.दरम्यान,जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

