- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत व साहित्यिकांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम येत्या,सोमवार २० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ३५२ कलावंत व साहित्यिकांच्या मूळ दस्तऐवजांची तपासणी करण्यात येणार असून,संबंधितांनी नियोजित ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन सदस्य-सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत),जिल्हा परिषद,गडचिरोली पंकज भोयर यांनी केले आहे.
योजनेसाठी सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातून एकूण ६५३ अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ३५२ अर्जदारांची यादी अंतिम करण्यात आली असून,ही यादी संबंधित पंचायत समिती, नगरपंचायत,ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पडताळणी कार्यक्रमानुसार देसाईगंज,कोरची, कुरखेडा व आरमोरी तालुक्यातील अर्जदारांची कागदपत्र तपासणी २० व २१ जुलै २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, देसाईगंज येथे सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे.
गडचिरोली,धानोरा व चामोर्शी तालुक्यातील अर्जदारांची पडताळणी २३ जुलै २०२६ रोजी वीर बाबुराव शेडमाके सभागृह,गडचिरोली येथे सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येईल.
तसेच मुलचेरा,सिरोंचा,अहेरी,एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अर्जदारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी २५ जुलै २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, अहेरी येथे सकाळी ११ वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे.
पात्र यादीत नाव असलेल्या कलावंत व साहित्यिकांनी पडताळणीसाठी वयाचा दाखला,आधार कार्ड,चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत दंडाधिकारी अथवा नोटरीसमोर केलेले प्रतिज्ञापत्र,पती-पत्नीचा संयुक्त फोटो(लागू असल्यास),बँक पासबुक,अपंगत्व प्रमाणपत्र(लागू असल्यास),राज्य किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्रमाणपत्र(लागू असल्यास),नामांकित संस्था किंवा व्यक्तीचे शिफारसपत्र(लागू असल्यास),सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रमाणपत्र(लागू असल्यास)तसेच कला क्षेत्रात किमान १५ वर्षे कार्य केल्याचा पुरावा ही सर्व मूळ कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.
पात्र कलावंत व साहित्यिकांनी आपल्या सोयीच्या नव्हे तर अर्ज केलेल्या तालुक्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावरच नियोजित तारखेला उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्ध यादीचा संदर्भ घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

