उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या आवाळपूर गावात दोन दिवसात पाच जणांचा तर आज २९ मे रोजी एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृत पावलेल्यांमध्ये आजाराचे लक्षणे नव्हती.त्यामुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने गावात भीती पसरली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावात ओआरएसचे वाटप करण्यात आले आहे.खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.आवाळपूर गावात दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.महादेव वासेकर वय ७० वर्षे,अंबादास धोटे वय ७२ वर्षे, चंद्रभान सोनटक्के वय ६८ वर्षे,संजय मांदाळे,अहिम शेख वय ३० वर्षे,नानाजी राघोबा चहारे वय ९० वर्षे अशी मृतकांची नावे आहेत.संजय मांदाळे हे मंगळवारला दुपारी शेतात गेले होते.शेतात ते मृत अवस्थेत आढळून आलेत.शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट जाणवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.२७ ते २९ मे दरम्यान विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसाठी हवामान विभागाने बुधवार,गुरुवार साठी यलो अलर्ट जारी केला आहे.गुरुवारपर्यंत सूर्यदेव उष्णतेपासून दिलासा देणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.जिल्हात सुरु असलेल्या सूर्यकोपाचे भीषण परिणाम पुढे आले आहेत.

