उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- वीज जोडणी घेण्याकरिता सर्वे करून चार विद्युत खांब बसत असतांना ते कमी करून तीन विद्युत खांब करण्याच्या कामाकरिता तक्रारदाराकडून दीड हजार रूपयांची लाच स्वीकारताना आरमोरी येथील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञास गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल,१४ जानेवारी २०२४ रोजी रंगेहाथ अटक केली आहे.महेंद्र डोमाजी बगडे वय ३६ वर्षे वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आरमोरी,असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला सोनपूर येथील सर्वे नं.२२ मध्ये वीज कनेक्शन घेण्याकरिता सर्वे करून चार खांब बसत होते.ते कमी करून ३ विद्युत खांब बसविण्याचा मोबदला म्हणून आरोपी महेंद्र बगडे याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने दीड हजार रूपये देण्याचे मान्य केले.परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सापळा रचला. दरम्यान,आरोपी महेंद्र बगडे यास काल रविवारला दीड हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड,श्रीधर भोसले,पोहवा शंकर डांगे,पोना किशोर जौंजारकर,पोलीस शिपाई संदीप घोरमोडे, संदीप उडाण,प्रवीण जुमनाके,चापोना प्रफुल डोर्लीकर यांनी केली.

