- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.पंकज दिलीप वाटगुरे वय २२ वर्षे,रा.धानोरी,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.विशेष म्हणजे,दिवसभर शेतातील धान रोवणीची कामे आटोपून पंकज जवळच असलेल्या तलावात आंघोळीसाठी उतरला.दरम्यान, त्याने एका मुलाकडे कपडे देत ‘मी लवकर आंघोळ करतो,असे सांगून तो तलावातील खोल पाण्यात उतरला.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने तो क्षणात दिसेनासा झाला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर पोलीस पथक व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.अंधार पडल्याने स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य राबविणे शक्य नसल्याने गडचिरोलीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चमुला पाचारण करण्यात आले.रात्री साडे आठ वाजता ही चमू धानोरी येथे पोहोचल्यानंतर शोध मोहीम तीव्र करण्यात आली.मात्र,रात्री उशिरापर्यंत तरुणाचा मृतदेह सापडलेला नव्हता.अश्यातच परत आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू केलेल्या शोध मोहीमेदरम्यान दुपारच्या सुमारास पंकजचा मृतदेह तलावात आढळून आला.त्यास बाहेर काढून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अवघ्या एक दिवसाच्या आड कुरखेडा तालुक्यात बुडून मृत पावल्याची दुसरी घटना घडल्याने पावसाच्या दिवसांत तलाव वा नदी-नाल्यांवर आंघोळ करणे टाळावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -

