- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपुर :-एका सहा वर्षीय चिमुकल्याचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.समीर मारोती आत्राम वय ६ वर्षे,रा.लछमागुडा, ता.जिवती,जि.चंद्रपूर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील लछमागुडा येथील चिमुकला समीर आत्राम झोपेत असतांनाच त्याला विषारी सापाने दंश केला.दरम्यान,काल सोमवारी सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याला तातडीने पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारार्थ गडचांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी पाठवतांना शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक होते.मात्र,ऐनवेळी पाटण आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही.रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी धावाधाव केली,पण यंत्रणेकडून वेळेत मदत मिळू शकली नाही.अखेर हताश झालेल्या कुटुंबीयांनी खासगी वाहनाची व्यवस्था करून चिमुकल्याला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले.खाजगी वाहन मिळेपर्यंत आणि गडचांदूर गाठेपर्यंत खूप मोठा विलंब झाला होता. शरीरात विष वेगाने पसरल्याने आणि वेळेत पुढील उपचार न मिळाल्याने अखेर या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली.या घटनेनंतर जिवती तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- Advertisement -

