- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होणे,कित्येक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होणे,धूळ व अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होणे व इतर अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच,पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होत आहे.यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.अनेकदा
बांधकामातील दिरंगाई बाबत संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराचे लक्ष वेधूनही ‘जैसे थे’ अवस्था पहावयास मिळत असल्याने देसाईगंज नगर परिषदेचे पाणी पुरवठा व जलनिःसारण सभापती तथा भाजपाचे देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाइपलाइन टाकणे,जलवाहिनी दुरुस्ती व इतर संबंधित कामे सुरू करण्यात आले असून सदर कामासाठी मे.हीर कॅन्स्ट्रक्शन,सुरत,गुजरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानुसार,१७ सप्टेंबर २०२४ रोजी देसाईगंज नगर परिषदेतर्फे कार्यारंभ आदेश देण्यात आला व सदर योजनेचे काम १८ महिन्यात पूर्ण करणे आवश्यक होते.अश्यातच १५ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करायचे असतांनाही काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नियोजित कालावधीत पूर्ण झालेले नाही. कामाच्या विलंबामुळे परिसरातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे, जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडून कामकाजात निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर करारातील अटी व शर्तीनुसार योग्य ती प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच सदर काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात; असे खरकाटे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
- Advertisement -

