- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिकडे पाहावे तिकडे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.विशेष म्हणजे,एकाच महामार्गावर सलग दुसऱ्यांदा अपघात घडल्याची घटना परत पुन्हा उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी जवळ धावत्या कारचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत पलटी झाल्याने कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना ताजी असतांनाच परत काल,गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच महामार्गावर जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली परिसरात एका भरधाव वेगाने असणाऱ्या ट्रकने गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी व गायीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार,एमएच ४०सीएम ५७६५ क्रमांकाचा
रेती भरलेला ट्रक जबलपूरहून नागपूरकडे निघालेला होता.अशातच सायंकाळच्या सुमारास एक गुराखी जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली परिसरातून जनावरे चारून परत येत असतांना कळपातील एक गाय महामार्गावर अचानक शिरली. त्यामुळे ट्रक चालकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र,ट्रक भरधाव वेगाने असल्याने चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता अनियंत्रित ट्रकने गायीसह गुराखीलाही चिरडले व नंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.अपघातात गायीचा आणि गुराखीचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान,ट्रकचालक आरिफ खान वय ३० वर्षे व सहकारी सोहेल खान वय २१ वर्षे हे दोघेही अपघातातून थोडक्यात बचावले. सहकारी यांस किरकोळ दुखापत झाल्याने त्याला मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच चोरबाहुलीचे पोलिस पाटील योगेश कंगाली यांनी ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी व देवलापार पोलिसांना कळवले.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रकचालकाला ताब्यात घेत घटनेचा पुढील तपास रामटेक पोलिस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

