- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पुलावरून पाणी वाहत असतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये,असे पावसाळ्याच्या दिवसात वेळोवेळी प्रशासनाकडून सांगण्यात येते.पण याकडे अनेकजण दुर्लक्ष करून स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात.अश्याच प्रकारे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी उघडकीस आल्या.यात दोघांच्याही दुचाक्या पुराच्या पाण्यात वाहत गेल्या.पहिली घटना गडचिरोली जिल्ह्यातील तर दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील आहे.गत तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे नद्यांची जलपातळी वाढली आहे.अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे.तसेच नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पुलाशेजारी तात्पुरत्या स्वरुपात रपटा बांधण्यात आला आहे.सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी २९ जून पासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी कुरखेडा पोलिस स्टेशन येथील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान,सोमवार ३० जून रोजी सायंकाळच्या सुमारास सदर पुलावरून अजय बाळकृष्ण रामटेके वय ४० वर्षे रा.श्रीरामनगर,कुरखेडा हे त्यांच्या दुचाकीने रपट्यावरून प्रवास करीत असतांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते आपल्या दुचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जात होते.याचवेळी पुलाच्या नजिक पोलिस बंदोबस्तात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे,सहाय्यक फौजदार शालिक मेश्राम व पोलीस हवालदार श्याम शेणकपट यांनी समयसुचकता दाखवित तत्परतेने दोरीच्या सहाय्याने सदर व्यक्तीला पाण्याच्या प्रवाहातून सुखरुपपणे बाहेर
काढण्यात आले.मात्र,पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून गेली.
दुसऱ्या घटनेत दुकान बंद करीत दुचाकीने आपल्या गावाकडे परतीची वाट धरणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पंचाईत झाली.छोट्याशा पुलावरून दुचाकीने प्रवास करीत असतांना अचानक पाण्याच्या प्रवाहात दुचाकी अडकली.दुचाकीसह व्यक्तीही खाली पडला.पुराच्या वेढ्यात अडकलेल्या संकटात सापडलेल्या व्यक्तीने मोठ्या शिताफीने दुचाकी तशीच सोडली आणि स्वतःचा जीव वाचविला.सदरची घटना उमरेड-कऱ्हांडला मार्गावरील भुसारी पाट याठिकाणी सोमवारच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास घडली.गिरधर तुकाराम सहारे वय ५० वर्षे,रा. कऱ्हांडला,ता.उमरेड असे पुराच्या वेढ्यातून सहीसलामत बाहेर निघालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गिरधर सहारे यांचे उमरेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीलगत एक छोटेसे दुकान आहे. दररोज गाव आणि दुकान असा प्रवास गिरधर सहारे यांचा असतो.सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसात गिरधर सहारे हे आपल्या दुचाकी क्रमांक-एमएच-४०एयू-९९९१ ने कऱ्हांडला गावाकडे निघाले.तत्पूर्वी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. कन्हांडला गावालगत भुसारी पाट आहे. हा पाट रस्त्यापेक्षा कमी उंचीचा आहे.यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहते असते. सोमवारीसुद्धा पाऊस झाल्याने पुलावरून पाणी वाहत होते.गिरधर सहारे यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी या पुलावरून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मध्येच दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती. दुचाकीसह स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न गिरधर सहारे यांनी केला.परंतु या धडपडीत दुचाकी वाहून गेली.गिरधर सहारे थोडक्यात बचावले. गावकऱ्यांना या घटनेची माहिती होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली.काल मंगळवारी सकाळी दुचाकीचा शोध घेतला गेला.मात्र,दुचाकी कुठेही आढळून आली नाही.
- Advertisement -

