- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-व्यवसायासाठी अनेकजण कर्ज घेतांना दिसून येतात.कुणी राष्ट्रीयकृत बँकेतून तर कुणी पतसंस्था वा इतर ठिकाणांहून कर्ज उचलून व्यवसाय करीत असतात.कर्जाची रक्कम मोठी असल्यास कर्जदाराचे गॅरंटर म्हणजेच हमी घेणारा आवश्यक असतो.कारण की,जर कां कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्जाची रक्कम परतफेड न केल्यास हमी घेणाऱ्यास जबाबदार धरले जाते व केव्हा-केव्हा हमी घेणाऱ्याकडूनही रक्कम वसूल केली जाते.मात्र, नुकतेच गोंदिया शहरातील कर्ज घेणारा व हमी घेणारा यांचे प्रकरण उघडकीस येताच अनेकजण अवाक् राहिले.एकाने कर्ज उचलले तर दुसऱ्याने हमी घेऊन चेक दिला.चेक दिला खरी,पण तो बँकेत वटलाच नाही.कारण खात्यात पर्याप्त रक्कमच नव्हती.त्यामुळे हमी घेणाऱ्यास मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांचा कारावास तसेच धनादेशाची रक्कम दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे.
सदर प्रकरण असे की,गोंदिया शहरातील आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीकडून कर्जदार बिपीन बोधानी यांनी मोबाइल शॉपीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.त्याने मासिक व्याजासह कर्ज फेडण्याचे मान्य केले होते.या प्रकरणातील आरोपी दीपक पृथ्यानी हा या कर्जात गॅरंटर (हमी घेणारा) होता.मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने पतसंस्थेने एक लाख नऊ हजार ४८४ रुपयांचा धनादेश २६ जुलै २०२१ रोजी बँकेत लावला.परंतु बँकेत पर्याप्त रक्कम नसल्याने तो धनादेश वटविण्यात आला नाही.परिणामी त्या संस्थेने कर्जदाराला नोटीस बजावली.कर्जदाराने त्या नोटीसचे उत्तरही दिले नाही.त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेने न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून या प्रकरणात हमी घेणाऱ्या दीपक पृथ्यानी यांस तीन महिन्यांचा कारावास व कर्जाची घेतलेली रक्कम दोन महिन्यांच्या आत त्या संस्थेला देण्याचे आदेश दिले.ही सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी केली.या प्रकरणात संस्थेचे वकील म्हणून ॲड.डी.टी.वैरागडे यांनी जबाबदारी पार पाडली. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यांत ती रक्कम आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटीला द्या,असे ठणकावून सांगितले. जर ती रक्कम दोन महिन्यांच्या आत संस्थेला न दिल्यास आणखी अतिरिक्त तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिल्याने हमी घेणाऱ्यास मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे एखाद्याची हमी घेतांना विचार करूनच पुढचे पाऊल टाका; अन्यथा कर्ज घेणारा सुटला अन् हमी घेणाराच आरोपी बनला.! अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
- Advertisement -

