- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा शनिवारी १५ मार्चला तलावात बुडून मृत्यू झाला होता.त्यामुळे पर्यटनस्थळाबत जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर येऊन पर्यटनस्थळी व धबधब्यांच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये,याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा यांनी यंत्रणेला दिले आहेत.दरम्यान,पर्यटनस्थळी आवश्यक उपाययोजनांची संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.यामध्ये निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख हे जबाबदार राहतील,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घोडाझरी येथे अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून पर्यटनस्थळी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे.दरम्यान, जिल्ह्यातील नदी,तलाव,धरणे, बधबे,किल्ले,जंगल या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,वन विभाग,पुरातत्त्व विभाग,संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (शहरी/ग्रामीण) व इतर आवश्यक यंत्रणा, सोबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.धबधबे,तलाव, नदी,डोंगराच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पॉइंट्स या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करावे,तिथे सूचना फलक लावावे,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जलपर्यटन तसेच अन्य ठिकाणी त्या-त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था,गिर्यारोहक,जिल्हा प्रशासनद्वारा प्रशिक्षित आपदा मित्र,स्थानिक स्वयंसेवक इत्यादींची मदत घ्यावी,गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी.त्या ठिकाणी प्रथमोपचार सुविधा असलेल्या ॲम्ब्युलन्सचीदेखील व्यवस्था करावी.उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत. त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना अशा प्रत्येक पर्यटनस्थळी,गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करावेत,असेही निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
- Advertisement -

