उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला आयपीएल क्रिकेटची धूम मचली असून सगळीकडेच क्रिकेट शौकीन आयपीएल वर सट्टा लावतांना दिसून येतात.काही दिवसांपूर्वीच अहेरी येथे आयपीएल सट्टयात सक्रिय टोळीचा पर्दाफाश करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आयपीएल क्रिकेट सट्टयातील रोख साडेतीन लाखांची रोकड जप्त करण्याची मोठी कारवाई देसाईगंज पोलिसांनी पार पाडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अहेरी येथे आयपीएलवर सट्टा खेळविण्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यासह दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर जिल्हा पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजांवर करडी नजर ठेवली आह.याच पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक-१ मे रोजी देसाईगंज पोलिस ठाणे हद्दीत आयपीएलवर सट्टा खेळवणाऱ्या इसमाबाबत गुप्त माहिती प्राप्त झाल्याने देसाईगंज पोलिसांनी शहरातील विर्शी टी पॉईट चौक येथे सापळा रचून नाकाबंदी केली.नाकाबंदीदरम्यान एम.एच.३३ एसी ५४४३ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ३ लाख ६६ हजारांची रोख रक्कम तसेच दोन मोबाइल जप्त करण्यात आले.वाहन चालक चेतन पुरुषोत्तम मस्के रा.कोरेगाव ता.देसाईगंज याची अधिक चौकशी केली असता त्याने सर्च इंजीनच्या सहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजअर आयडी व पासवर्डच्या मदतीने आयपीएल सट्टा खेळल्या जात असल्याचे सांगितले.
यावेळी रोख रक्कम, दोन मोबाइल तसेच चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३१ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यावेळी वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीश नरळ रा.शेगांव ता.वरोरा जि.चंद्रपूर या दोघांविरुध्द देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज अजय जगताप,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार आदींनी पार पाडली.

