उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोलीजिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींना मागील काही वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने वीज अटकाव यंत्रांचे वाटप करण्यात आले होते.त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गावामध्ये वीज अटकाव यंत्र लावले आहे.वीज अटकाव यंत्र तर लावण्यात आले; मात्र, लावण्यात आलेले वीज अटकाव यंत्र पडणाऱ्या विजेचा अटकावच करीत नसल्याने सदरचे यंत्र हे बिनकामी होऊन निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
अवकाळी पाऊस वा पावसाळ्यात शेतात काम करीत असलेले नागरिक,गावातील पान टपरीवर वा इतर ठिकाणी झाडाच्या आडोश्याला असलेले नागरिक,जनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या नागरिकांवर तसेच जनावरांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे अनेकांचे विजे पासून संरक्षण व्हावे; यासाठी वीज अटकाव यंत्रे लावण्यात आली.वीज अटकाव यंत्र लावल्यास पडणाऱ्या विजेपासून गावाचे संरक्षण करता येते.अशा यंत्रामुळे जवळपास दीड किलोमीटर अंतरावरील परिसराच्या आत वीज पडून कुठल्याही प्रकारची जीवितहानी टाळली जाते.वीज अटकाव यंत्र वीज पडण्यापासून थांबवू शकते.मात्र,देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या गावातील परिसरात लावण्यात आलेले वीज अटकाव यंत्र हे निकामी होऊन पाचशे मीटर अंतर तर सोडा गावात तसेच नजीकच्या परिसरात वीज पडून ‘जोर का झटका धिरेसे’ लागत असल्याने अनेकांची घाबरगुंडी होतांना दिसून येत आहे.अशातच लावलेली यंत्रे पडणाऱ्या विजेचा कशा प्रकारे अटकाव करून त्याची विल्हेवाट लावतेय हेच अनेकांना कळेनासे झाले आहे.लावण्यात आलेली वीज अटकाव यंत्रे सुरू आहेत की बंद अवस्थेत आहेत; हे कुणास ठाऊक,जसे चालतेय तसेच चालू द्या..! अशी अवस्था निर्माण झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल,दुरुस्ती करण्यातच आली नसल्याने वीज अटकाव यंत्र ‘उभा व शोभा’ असे झाले आहे.

