उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजपासून चार दिवस गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात २ जून ते ५ जून पर्यंत पावसाचा येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला,तरी पावसानंतर पुन्हा उकाड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मागील आठवडाभरापासून राज्यासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे.तीव्र उष्णतेने नागरिक घामाघूम होत असतानाच,हवामान विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यासह पाच जिल्ह्यात चार दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नवतपाची सुरुवात होताच,विदर्भासह जिल्ह्यात तापमानाची तीव्रता वाढली आहे.उन्हाच्या तडाख्याने जिल्हावासीयांची होरपळ होत आहे.मे महिना हिटच्या तडाख्याने वातानुकूलित यंत्रही काम करेनासे झाले आहेत.त्यातच मागील दिवसांपासून तापमानात काही प्रमाणात घट जाणवत आहे.अवकाळी पावसाबरोबरच काही भागात तीव्र उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.रात्रीच्या उकाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे.तीव्र उष्णतेच्या झळा आणि उकाडा पुढील काही दिवस कायम राहणार आहे.उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या नागरिकांना हवामान विभागाने एकप्रकारे काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

