उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर (चिमूर) :- चिमूरशहरातील साईनाथ (अश्वमेघ) बुटके व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगासह दाखल केलेले विविध गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, याकरिता आमदार भांगडिया समर्थकांनी बालाजी मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे,चिमूर विधानसभेचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांचे कुटुंबीयाबाबत चिमूर येथील साईनाथ (अश्वमेघ) बुटके यांनी,सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारण पोस्ट व स्टेटस ठेवले होते.त्यामुळे कुटुंबीयांची समाजात बदनामी झाली.ही घटना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदारांनी साईनाथ( अश्वमेघ) बुटके यांना समजविण्याचा प्रयत्न केला.मात्र,आमदारांना बदनाम करण्याच्या द्वेषभावनेने बुटके यांच्या पत्नीने चिमूर पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली असा आरोप केला.हे सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे आमदर भांगडिया व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे त्वरित हटविण्यात यावे.अशी मागणी भाजपा महिला आघाडी चिमूर तालुका, भाजयुमो चिमूर तालुका, भाजपा सर्व आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मुकमोर्चा निमित्याने चिमू व्यापारी मंडळाने दुकाने बंद ठेवली होती.