उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया:- आमगाव तालुक्यातील बनगाव येथील शेतकरी शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने याची तक्रार करण्यासाठी ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता; त्यांनी उपाययोजना सूचविण्याऐवजी शेतात पाणी पोहोचत नसेल तर शेती कशाला करता? असा अजब-गजब सल्ला दिल्याने शेतकरी बांधव नाराज होऊन संताप व्यक्त करीत आहेत.
शेतकरी बांधव खरीप हंगामासह रब्बी हंगामात सुद्धा शेतीची मशागत करीत असतात.यंदा ४५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुद्धा पुरेसा पाणीसाठा आहे.त्यामुळे अनेक शेतकयांनी रब्बी विभागाच्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते.पण काही शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम संकटात आला आहे.बनगाव येथील शेतकरी सुखराम थेर यांच्या शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नाही त्यामुळे या संदर्भात त्यांनी संबंधित ईटीयाडोह व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तक्रार केली.
त्यानंतर शाखा अभियंता आणि कालवा निरीक्षक यांनी थेर यांच्या शेतीला भेट दिली.शेतात पाणी जाण्यासाठी जवळ मोंगाड पायली बसविण्याची परवानगी द्यावी किंवा पंप बसवून शेतीची लागवड करण्याची मुभा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केली व उलट शेतकऱ्याला शेती कशाला करता? असा अफलातून सल्ला दिल्याचे शेतकरी सुखराम थेर यांनी सांगितले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सदर प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे थेर यांनी म्हटले आहे.