उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- देसाईगंज तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या शिवराजपूर येथील ग्रामंचायत सभागृहात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात दारू विक्री बंदीचा ठराव पारित करून शिवराजपूर,ऊसेगांव,फरी- झरी गावातील अवैध धंदे वाल्यांना तंबी देऊन दारू विक्री केल्यास शासकीय दाखले,शासकीय योजना व दंडात्मक रक्कम आकारून कारवाई करण्यात येणार असल्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे.
गेली कित्येक वर्षांपासून शिवराजपूर व इतर आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये अवैधरीत्या दारू विक्रीचे धंदे फोफावून तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती.दारूमुळे अनेकांची संसारे उध्वस्त होऊन कौटुंबिक कलह वाढीस लागले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने दारूविक्री बंदी हाच एकमेव उपाय असल्याने शिवराजपूर गट ग्रामपंचायतीतर्फे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी,युवा वर्ग,गावकरी यांनी मिळून निर्णय घेतला.
सभे प्रसंगी ग्रामपंचायतस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच सुष्मा सयाम,उपसरपंच वाढई,सदस्य झिलपे, मारोती बघमारे,ग्रामसेविका मैंद,पोलिस पाटील दर्वे,दारूबंदी संघटनेचे सर्व युवक,सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
दारूविक्री बंदी करीता मादक द्रव्य समिती गठीत करण्यात आली.सभेत गावातील नागरिकांनी सरपंचांना निवेदन सादर करून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावरून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तिन्ही गावांमध्ये अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला.कोणत्याही नागरिकांनी दारूविक्री केल्यास त्याला शासकीय दाखले योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल. दारूविक्रेत्यांकडून दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल.तिन्ही गावातील पानठेले व किराणा दुकानांची नोंदणी करण्यात येईल.तसेच दारू पिणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.