उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील उसेगांव बिटातील जंगल परिसरात अंदाजे जवळपास ५० फूट उंच मनोरा वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये वन विभाग वडसा यांच्या मार्फतीने बांधकाम करण्यात आला.बांधकाम करून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.मात्र लाखो रुपये खर्चूनही लोखंडी मनोऱ्या ला साधा पेंटही मारल्या गेला नसल्याने मनोरा जंग खात आहे.सदर मनोरा जंग खात असूनही वन विभाग देसाईगंज (वडसा) चे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
मागील वर्षी देसाईगंज तालुक्यात नरभक्षक वाघ,वाघीण व इतर हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घालत होता.तालुक्यातील कोंढाळा, उसेगांव,डोंगरगांव,कासवी व इतर जंगल परिसरात वन्य प्राण्यांचे वावर वाढले होते.अशातच काही ठिकाणी जंगल परिसरात लाकडी मचान तयार करून वन्य प्राण्यांवर पाळत ठेवणे,जंगल परिसरात आग लागल्यास पटकन लक्षात यावे,वन तस्करीवर आळा घालण्यासाठी व इतर कामासाठी लाकडी मचान बांधकाम उपयोगात आणले जात होते.सदर लाकडी मचान कधीकाळी ऊन,पाऊस,वादळ,वारा व इतर कारणांमुळे तग धरेल किंवा नाही व सदर मचान कमी उंचीचे असल्याने जास्त दूर वरचे दृश्य दिसेनासे होऊन एखादेवेळी हिंस्त्र प्राणी मचानावर चढून वन कर्मचारी वा वन मजुरांवर हल्ला चढविण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची बाब लक्षात घेता वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा वरून पूर्वेस दोन किलोमीटरवर अंतरावरील उसेगांव बिट जंगल परिसरातील उसेगांव कडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगतच्या बाजूस लोखंडी अंदाजे जवळपास ५० फूट उंच मनोरा तयार करण्यात आला आहे.लोखंडी उंच मनोऱ्यामुळे दूरवरचे दृश्यही न्याहाळता येणार आहे.त्याच बरोबर जंगल परिसरात लागलेली आग,वन तस्करी,वन्य प्राणी व इतर यांच्यावर पाळत ठेवता यावे; यासाठी लोखंडी मनोरा तयार करण्यात आला आहे.मनोरा तर तयार करण्यात आला.मात्र सदर लोखंडी मनोऱ्याला साधी पेंट ही केली गेली नसल्याने मनोऱ्यावर चढतांना संपूर्ण हात जंगामुळे भरून,पांढरे शुभ्र कपडे घालून मनोऱ्यावर चढल्यास अंगावरील कपड्यांचीही वाट लागते.अशातच पेंट नसल्याने पावसात हळूहळू जंग चढून लोखंडाचे आयुष्य कमी होऊन,लाखो रुपयांच्या लोखंडी मनोऱ्यावरील केला गेलेला खर्च पाण्यात वाया गेल्याशिवाय राहणार नाही.त्याच बरोबर लाखो रुपयांच्या मनोरा बांधकाम अंदाज पत्रकात साधी पेंट ही करण्याची तरतूद करण्यात आली नसावी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.अंदाज पत्रकात तरतूद असेल तर मग त्याला पेंट कां करण्यात आली नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.यांस सर्वस्वी जबाबदार कोण?