उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्कर रात्रीच्या अंधारचा व शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत ढेक-ढेक ट्रॅक्टरचा आवाज करीत सुसाट वेगाने गावातील मुख्य रस्त्यावरील व इतर चोरट्या मार्गाने वाहने पळवित गावातील नागरिकांची झोप उडवीली आहे.अशातच ‘रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ आणखी किती दिवस सुरू राहणार आहे.यांवर आवर घालणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्याच्या घडीला सगळीकडेच अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे.शासन स्तरावरून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कितीही कठोर पावले उचलली जात असली तरीही रेती चोरटे याला न जुमानता आपलीच मनमानी करून झटपट श्रीमंतीच्या नादात अवैध रेती चोरी करण्याकडे वळलेली दिसून येत आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीचा उपसा रात्री १२ ते १ वाजे पासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शासकीय कार्यालयांना तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा फायदा रेती चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे. सुट्ट्यांमुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असल्याचे कळते.काही शासकीय कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने याचाच फायदा रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.
हल्ली रेतीचा तुटवडा अनेकांना जाणवत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत.रेती चोरट्यांची यामुळे चांदीच-चांदी पहावयास मिळते आहे.अंतर ठरवून रेतीचे दर ठरविले जात आहेत.एक ब्रास रेतीसाठी ३ हजार ते ५ हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागत आहे.यामुळे रेती तस्करांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी झाली आहे. शासनाच्या उदासीन धोणामुळे अनेक रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली गेली आहे.त्यामुळेच अवैध रेती तस्करी फोफावली असल्याचे सगळीकडेच चित्र निर्माण झाले आहे.मात्र यामधे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी केली जाते आहे.’रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ कधी बंद होणार व अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर आळा घातला जाणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

