चुडाराम बल्हारपूरे
उद्रेक न्युज वृत्त :- खरं तर डॉ.प्रा.चंद्रशेखर डोंगरे हे शेखर डोंगरे या नावाने झाडीपट्टीस परिचीत व्यक्तिमत्व. कोणतेही आणि कुठलेही नाटक असू द्या. शेखर डोंगरे हे जर नाटकात असतील तर नाटकास प्रेक्षकांची गर्दी हमखास होणार, असे सुत्र ठरलेले. कारणही तसेच आहे. शेखर डोंगरे यांनी झाडीपट्टीतील रसिकांना हसवण्याचा वसाच घेतला आहे. विनोदी कलावंत म्हणून ते अख्ख्या झाडीपट्टीस परिचीत आहेत.
मला आठवते साधारणत: १९९० च्या सुमारास असेल झाडीपट्टीतील रंगभुमिवरील दादा कोंडके म्हणून प्रसिध्द असलेले व नुकतेच पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत डॉ. परशुराम खुणे आणि शेखर डोंगरे या जोडगोळीस झाडीपट्टीतील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांचा जीवंत अभिनय पाहून रसिक प्रेक्षक खुष व्हायचे. नंतर या जोडगोळीने द्वैअर्थी नावाने असलेल्या नाटकातून अभिनय सुरु केला. काही ठिकाणी कमरेखालील विनोदही करुन जायचे. काहींना ते आवडायचे नाही, पण त्यावेळी देखील बहुसंख्य रसिकांनी त्यांना पसंतीच दिली होती ती त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे केवळ आचकट विचकट अभिनय व माकडउड्या न मारता ते आपल्या अभिनयातून एक चांगला संदेशही द्यायचे.
शेखर डोंगरे यांना वेळेवर भुमिका दिली, तरी केवळ संहिता वाचून ते वेळेवर आपली भुमिका चोख करायचे ते अभिनयाच्या जोरावर वेळेवर संहिता चाळली तरी त्यातील भुमिका समजून घ्यायचे. त्या भुमिकेची मध्यवर्ती कल्पना डोक्यात उतरवायचे. मग काही मुळ संहितेतील संवाद,तर काही स्वयंस्फुर्तीने आलेले संवाद म्हणून ते वेळ मारुन न्यायचे. पण परिणाम निश्चीत चांगला व्हायचा. त्यांनी केलेला विनोद लोकांना आवडायचा.ते झाडीपट्टीतील कलावंत म्हणून परिचीत असले तरी त्यांचा माझा असा फारसा संबंध आला नाही.
कारण माझे स्वत: चे नाट्यमंडळ असल्याने मी त्यांच्या मंडळातील किंवा वडसा येथील नाटकांना कलावंत किंवा लेखक म्हणून कधी गेलो नाही. पण एक रसिक प्रेक्षक म्हणून त्यांची खुप सारी नाटके प्रेक्षागृहात बसून मी स्वत: पाहिलेली आहेत. अनुभवलेली आहेत. आस्वाद घेतला आहे. अजूनही संधी मिळाली की मी त्यांची नाटके आवर्जून बघायला जातो.अलिकडे त्यांचे सोबतीने असलेली विनोदी कलावंत मंडळी अजूनही कमरेखालील विनोद करण्यात धन्यता मानतात. झाडीपट्टीतील रसिकांना आवडते म्हणून. पण समोरील प्रेक्षकात कोणीतरी आपली आई आहे, आपली भगिनी आहे, आपली मुलगी आहे,कोणी सहकुटूंब नाटक पाहायला आले असून आजच्या नाटकानंतर ते घरी एकत्र बसून जेवणार आहेत, एकत्र वावरणार आहेत, तेंव्हा त्यांना उद्या एकत्र वावरतांना एकमेकांकडे बघताना संकोच व्हायला नको, याची जाण जर या कलावंतांनी ठेवली तर निश्चीत झाडीपट्टीची एक चांगली ओळख ईतर नाट्यजगतात होईल. आणि प्रेक्षकांना देखील वेगळे समाधान लाभेल. डॉ. शेखर डोंगरे हे याला अपवाद म्हणावे लागतील. पण त्यांनी आपल्या सहकारी कलावंतांना याची समज देणे आवश्यक आहे, एवढे सांगावेसे वाटते.
अलीकडे त्यांची खुप सारी नाटके गाजताहेत.दरवर्षी ते १०० च्या वर नाटकांचे प्रयोग झाडीपट्टीत सादर करताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. नुकतेच अनिरुध्द बनकर यांनी निर्मीती केलेल्या ज्योतीबा फुले यांच्या “तृतीय रत्न” मध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका केलेली आहे.अशी काही नाटके त्यांनी पुढे आणावीत.कोठारी येथे झालेल्या २ च्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.एक जबाबदार अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडलेली आहे. आता ४ थ्या झाडीपट्टी संमेलनात त्यांनी झाडीपट्टीचे अर्थकारण व्यासपीठावरुन स्पष्ट केले.अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून केलेला हा अभ्यास खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. स्मरणिकेतही त्यांचा हा संशोधन केलेला विषय देण्यात आला असल्याचे कळले.अजून मी ती स्मरणीका पाहिली नाही. पण व्यासपीठावरुन मात्र एका चर्चासत्राचे वेळी ती रसिक प्रेक्षक म्हणून मी अनुभवली आहे.
त्यांचा माझा संबंध माझ्या एका नाटकाचे वेळी आला. त्या नाटकाचे नांव आहे “लावणी विश्वाची”या नाटकांत त्यांना विनोदी भूमिका करण्याकरीता बोलावण्यात आले होते.त्या वेळी ते त्यांच्या स्वत: च्या मंडळा व्यतिरिक्त ईतरही नाटकात वैयक्तिक रित्या अभिनय करायला जात होते.साधारणत: सन १९९७ -९८ च्या सुमारास असेल.माझे स्नेही दिलीप मेश्राम यांनी वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे कलावंतांसह त्यांनाही पाहूणे कलावंत म्हणून पाचारण केले होते. मौजा- जांभळी येथील तो प्रयोग होता. या प्रयोगाची त्यांची भूमिका असलेली फरदी त्यांचेकडे पोहचलीच नाही. मला हे कळल्यानंतर मी दिलीप मेश्राम यांचेवर नाराजही झालो. पण ते वेळेवर भूमिका करतात, याची खात्री असल्याने ते नाटकाचे ठिकाणी पोहचताच त्यांना संहिता देण्यात आली.
साधारणत: अर्धा तास ते संहिता घेवून बसले. भुमिका समजून घेतली आणि निभावून नेली.वेळेवर त्यांनी केलेली भुमिका तुफान झाली.नाटकही छान झाले.आता त्यांचा माझ्याशी दुसरा संबंध म्हणजे ते आमच्या आरमोरी गावचे जावई.त्यातही मला शिकवणारे आमचे गुरु “शेंडे सर” यांची मुलगी त्यांना दिलेली. मला हा त्यांचा परिचय माहिती नव्हता.पण “लावणी विश्वाची” या नाटकातच त्यांचा हाही परिचय झाला. आणि जवळीक साधल्या गेली,ती कायमचीच. अजूनही एखादे कार्यक्रमाचे वेळी त्यांची माझी भेट झाली की,आम्ही बोलतो.
आता ते सेवानिवृत्त होत आहेत.यानंतर त्यांचेकडे भरपूर वेळही असेल,कॉलेजच्या जबाबदारीतून ते मोकळे झालेले असतील.त्यामुळे त्यांनी यापुढे आपला संपुर्ण वेळ झाडीपट्टीसाठी खर्ची घालावा.जुन्या कलावंतांत रुळतांना नविन कलावंत तयार करण्याचा वसाही त्यांनी स्विकारावा.नविन कलावंत घडवावेत. नवोदितांना मार्गदर्शन करावे,अभिनयाच्या कार्यशाळा घ्याव्यात,आपली कलावंतांची नविन पिढी तयार करावी एवढी त्यांचेकडून अपेक्षा बाळगून लेखनीला विराम देतो.
चुडाराम बल्हारपूरे, (नाटककार) “महामृत्युंजय” भ्रमणध्वनी – ९६२३६६३४३५ / ९४२२३६४३९०
संकलन – उद्रेक न्युज वृत्त