उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-प्रेमसंबंधातून लग्न झालेल्या एका विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.स्नेहा राहुल कावळे रा.आझाद चौक,पवनी असे मृत विवाहितेचे नाव आहे.कावळे दाम्पत्याला एक वर्षाची मुलगी आहे.
मृत स्नेहाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पवनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील स्नेहा हिचे लग्न पवनी येथील राहुल कावळे यांच्यासोबत झाले होते.राहुल हा मद्यपान करून स्नेहाला मारझोड करत असे.तसेच माहेरहून शेतीचा हिस्सा आण, यासाठी तगादा लावत होता.स्नेहाचे वडील जावयाची वारंवार समजूत घालत होते. रविवारी चुलत स्नेहाच्या भावाचे लग्न असल्याने राहुल व स्नेहा मांडव कार्यक्रमानिमित्त येथे आले.यावेळी राहुलने स्नेहाशी भांडण करून मारहाण केली. पतीच्या जाच व मानसिक त्रासामुळे मी एक दिवशी जीव देईन, असेही स्नेहाने यापूर्वी म्हणून दाखवले होते.याच जाचाला कंटाळून स्नेहाने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले व यातच तिचा मृत्यू झाला. पवनी पोलिसांनी राहुल कावळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयाने राहुलला १३ मार्च पर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.