उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथील पवन भगत यांच्या घरातून ९५ हजार रुपये,तर मोहन तोकलवार यांच्या घरातून १ लाख १० हजार रुपये जप्त केले.पवन व मोहन यांच्यावर जुगार कायद्यान्वये बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु,जप्तीमध्ये केवळ ४० हजार रुपये दाखविण्यात आले; असा आरोप पवन भगत यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच चर्चेत आली होती.चर्चा नमण्यापूर्विच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत जप्त केलेल्या एकूण दोन लाख पाच हजार रोकडपैकी केवळ ४० हजार रुपयेच दाखवले व उर्वरित रक्कम आपसात वाटप केल्याची गंभीर तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रकरणातील आरोपी बल्लारपूर येथील पवन भगत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.त्यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या कारवाईतील रकमेची अफरातफर करून आपापसात वाटप केल्याचा गंभीर आरोप करून शासन दरबारी चुकीची नोंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.आता चेंडू पोलिस अधीक्षकांच्या कोर्टात गेल्याने ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईत अधिक रोकड जप्त करून शासन दरबारी कमी रक्कम दाखवल्याची माहिती होताच जिल्ह्यातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.उलगुलान संघटना,भीम आर्मी, दलित पँथर आदी संघटनांनी एकत्र येत जप्तीच्या कारवाईत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

