- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-पुस्तकातील निसर्ग शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभवणे अधिक प्रभावी असते,याचा सुंदर प्रत्यय वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी नैनपूर तलाव परिसरात आला.महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड देसाईगंज येथील विद्यार्थ्यांसाठी वनविभागाच्या वतीने आज,मंगळवार सकाळी सात वाजता पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.देसाईगंज वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर.धोंडणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची ओळख,त्यांचे अधिवास,पर्यावरणातील महत्त्व आणि संवर्धनाची गरज याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे व शिवराम हाके यांच्या वतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी के. आर.धोंडणे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व,पक्ष्यांचे पर्यावरणातील स्थान आणि जैवविविधता जपण्याची जबाबदारी याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिण व आधुनिक पक्षी निरीक्षण साधनांच्या साहाय्याने नैनपूर तलाव परिसरातील विविध पक्ष्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.पक्ष्यांचे रंग,आकार, आवाज,हालचाली आणि अधिवास यांचे निरीक्षण करतांना विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले.
मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी विद्यार्थ्यांना “निसर्ग केवळ पाहायचा नाही,तर समजून घ्यायचा आणि जपायचा आहे.आज आपण पाहिलेला प्रत्येक पक्षी हा आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
या उपक्रमासाठी क्षेत्र सहाय्यक सेलोटे,मोहुर्ले,धात्रक, चांदेवार,जनबंधु,वनरक्षक अहीर,रामटेके,पंधराम, गिन्नलवार,शडमेक,लांजेवार,दहीकर,राऊत,मगरे,वट्टी तसेच वनमजूर भागडकर,कुथे व दुपारे यांनी विशेष सहकार्य केले.
पक्षी निरीक्षणाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ विविध पक्ष्यांची ओळखच झाली नाही,तर जैवविविधता,पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी यांची जाणीवही झाली.
“पक्षी जपा… निसर्ग जपा…पर्यावरणाचे भविष्य घडवा!” या संदेशाने प्रेरित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञान,अनुभव आणि निसर्गप्रेमाची अनमोल शिदोरी देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.

- Advertisement -

