उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील चोप येथील मुलगा शुभम मन्साराम कुथे आणि शंकरपूर गावातील मुलगी दीक्षा भाऊराव मेश्राम या दोघांचे काही वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.मात्र दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लग्न कार्याकरिता लागणारे डेकोरेशन,सभामंडप व दोन्ही कुटुंबीयातील जेवणाचा संपूर्ण खर्च कसा करायचा? असा प्रश्न नेहमी भेडसावत होता.अशातच सदर बाब देसाईगंज तालुक्यातील चोप येथील श्री दत्त सेवा समितीच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आली असता; एका गरीब प्रेमीयुगलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत अवघ्या १ रुपयात चोप स्थित दत्त मंदिराच्या सभागृहात प्रेमीयुुलांचे लग्न लावून दिले असल्याने नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजापुढे सदर समितीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
विवाह प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुझेंकर,संस्थेचे सचिव त्र्यंबक भजने,उपाध्यक्ष केशव लांजेवार,मुखरु कुथे,लहिराम तितीरमारे,सोमेश्वर नाकाडे,रुषि लांजेवार,दादाजी चहांदे,भाऊराव कुथे,कैलास कुथे व गावकरी नागरिक लग्न सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.