उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील नावारूपास आलेल्या कोंढाळा येथे सर्वच प्रकारची अवैधरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.पिण्यासाठी सर्वच प्रकारची दारू उपलब्ध होत असल्याने तळीरामांना कुठेही भटकंती करावी लागत नाही.अशातच दिवसाढवळ्या पोत्याचवरी अवैध दारूचा विक्रेत्यांना पुरवठा केला जात असल्याने याचे नवल वाटते आहे.गावात थंडी बियर पासून देशी-विदेशी,गावठी मोहफुलाची व पावडर मिश्रित सिंधीची खुलेआम विक्री होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कुणाचाही वचपा नसल्याने ‘हम करे सो कायदा पास’ असे हल्ली चित्र कोंढाळा गावात निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात असल्याने याकडे संबंधित विभागाने आता लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
देसाईगंज शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावात दिवसेंदिवस दारू विक्री करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे.नवनवीन दारू विक्रेत्यांची अवैध धंदे उदयास येऊ लागले आहेत.अशातच झटपट पैसा व लवकर श्रीमंतीच्या नादात कमी वयाची युवा पिढी अवैध धंद्यांकडे वळलेली दिसून येत आहे.काहीजण ‘आव भैय्या,कोणसी दारू होना’ व एका फोन वरती सहजरीत्या थंडगार बियर,विदेशी दारू उपलब्ध करून दिल्या जात आहे.कित्येकजण पैसा नसल्यास घरातील शेतमाल दारू विक्रेत्यांना विकून दारू पिण्यासाठी वापर करीत असल्याने अनेकांची संसारे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निदर्शनास येऊ लागले आहे.
तालुक्यात हल्ली दारुविक्रेत्यांना होलसेल दारूचा पुरवठा करणाऱ्यांकडून पोचती दारू दिली जात नसली तरीही काही दारू विक्रेते विद्यार्थी बनून पाठीमागे बॅग लटकवून दुचाकीने स्वतःच अवैध दारूची ने-आण करतांना दिसून येतात.अशातच काहीजण गांगलवाडी मार्गे,ब्रम्हपुरी-वडसा मार्गे गावात चक्क दिवसाढवळ्या पोते भरभरून देशीचे टिल्लू अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना पुरवठा करतांना दिसून येतात.गावामध्ये बाहेर ठिकाणाहून आलेले जोमात पावडर मिश्रित सिंधी व ताळी विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू लागले आहेत.अशांना दुजोरा देणाऱ्यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते.गावात दारू मिळत नाही काय? म्हणण्यापेक्षा कोणता ब्रँड पाहिजे; असे हल्ली चित्र निर्माण झाले असल्याने यावर संबंधित विभागाने कानाडोळा न करता; यावर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा थंडी बियर,देशी-विदेशी,गावठी मोहफुल व पावडर मिश्रित ताळी,सिंधीचे गावात राज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.