उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज शहरातील गेली कित्तेक वर्षांपासून नवीन बसस्थानकाचा मुहूर्तच सापडत नसल्याने जुन्या बसस्थानकाच्या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या बसस्थानकावर महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहने उभी करण्यासाठी जागा उरत नाही.तसेच दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.परिणामी येथे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न जटील झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून नव्या बसस्थानकाची मागणी होत असतांना बसस्थानक निर्मितीचा प्रश्न अडगळित पडला आहे.
येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम केव्हा होणार? याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.कित्येक वर्षांपासून मुख्य महामार्गावर असलेले बसस्थानक या ठिकाणी असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते.वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच परिवहन महामंडळाने बसफेऱ्या कमी केल्या असल्या तरी या परिसरात रोजच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते.येथे मुख्य बाजारपेठ असून दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे.वाहनांची संख्याही दुपटीने वाढल्याने रस्ते कमी पडत आहेत.वर्दळीचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
नवीन बसस्थानक सुरू झाल्यास वाहतुकीची कोंडी,प्रवाशांची होणारी गैरसोय व इतर समस्यांचे निराकरण होणार असल्याने देसाईगंज नवीन बसस्थानकाचे मुहूर्त लवकरात-लवकर काढावे.अशी मागणी जोर धरू लागली आहे.