उद्रेक न्युज वृत्त
भंडारा : – विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्यावर ट्रॅक्टर चालवून जीवघेणा हल्ला केला. सदर घटना पवनी तालुक्यातील खातखेडा रेती घाटावर घडली.आशिष काटेखाये (वय ३५),पंकज काटेखाये (वय ३३) व एका अनोळखी व्यक्तीवर पवनी पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.यापूर्वी पवनी तालुक्यात रेती तस्करांनी उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता.
खातखेडा येथील नदी घाटावरून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यावरून नायब तहसीलदार मयूर चौधरी, तलाठी बहुरे व किरण मोरे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान,नदी घाटातून विना नंबरचा ट्रॅक्टर बाहेर येताना दिसताच चालकाला थांबवून टॉर्चच्या सहाय्याने झडती घेण्यात आली. यावेळी ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती दिसल्याने रॉयल्टी संदर्भात विचारणा करण्यात आली.सदर रेतीची रॉयल्टी नसल्याचे चालकाने सांगितल्याने ट्रॅक्टरच्या जप्तीची कारवाई करण्यास महसूल कर्मचारी सज्ज होताच चालकाने मालकाला भ्रमणध्वनीवरुन कळविले.
दुचाकीने मालक व एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी दाखल होऊन ‘तुम्ही माझा ट्रॅक्टर वारंवार कसा लावता? तुमचा बंदोबस्त लावतो’ असे म्हणून चालक आशिष काटेखाये,मालक पंकज काटेखाये व एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून तलाठी किरण मोरे यांच्या अंगावर भरधाव वेगाने रेतीचा ट्रॅक्टर चालविला.यात तलाठी मोरे यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून गंभीर जखमी झाले.
त्यानंतर घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. घटनेची माहिती होताच महसूल विभागाच्या भरारी पथकाची गाडी दाखल होऊन उपचारासाठी तत्काळ पवनी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पायाचे हात मोडल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची तक्रार पवनी पोलिसांत देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.