उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- आरोपी दिलीप अंबुले विरुद्ध दवनीवाडा पोलिस ठाण्यात अवैध दारूविक्रीसह विविध प्रकारचे २३ गुन्हे दाखल आहेत.तो सराईत गुन्हेगार असून मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा आहे.त्याच्या कृतीमुळे बघोली, परसवाडा,दवनीवाडा परिसरातील महिला,मुली व प्रतिष्ठित सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.तसेच लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने सर्वसाधारण व्यक्ती त्याचेविरुद्ध उघड साक्ष देण्यास येत नाहीत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वारंवार कारवाई करूनसुध्दा त्यात सुधारणा झाली नाही.या गुन्हेगाराच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.यामुळे दवनीवाडा ठाणेदारांनी त्याला गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याकरिता कलम ५६ (अ), (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रस्ताव तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रमोद मडामे यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याची शिफारस केली होती.
दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बघोली येथील अवैध दारूविक्रेता दिलीप मनिराम अंबुले वय ५५ वर्षे याला जिल्ह्यातून 3 महिन्यांपर्यंतच्या कालावधीकरिता तडीपार करण्यात आले आहे.सदर आदेश १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पूजा गायकवाड यांनी काढला आहे.