- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा नदीवर कुटुंबीयांसह आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या असल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती.प्रतिमा प्रकाश मंडल वय२३ वर्षे,कविता प्रकाश मंडल वय २२ वर्षे व लिपिका प्रकाश मंडल वय १८ वर्षे अशी नदीत बुडालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत.तिन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार पार पडले.बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील मंडल कुटुंबीय आपल्या परिवारासह गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्याच्या व्याहाड (बुज) येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते.
काल गुरूवारी तिसऱ्या मुलीचा मृतदेह देखील सापडला.एकाचवेळी तिन्ही मुलींचे मृतदेह पाहून आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला.मनावर मोठा आघात झाला.वैनगंगा नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत कविता व प्रतिमा यांचे मृतदेह बुधवारी मिळाले.तर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास लिपिकाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.तिन्ही मृतदेह सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता नेण्यात आले. त्यानंतर या तिघींवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रपुरातील बाबुपेठ येथील मंडल कुटुंबातील प्रणव वसंत मंडल वय ४० वर्षे,पूनम प्रणव मंडल वय ३० वर्षे,प्रथमेश प्रणव मंडल वय ५ वर्षे,कल्पना प्रकाश मंडल वय ४२ वर्षे, प्रतिमा प्रकाश मंडल वय २३ वर्षे,कविता प्रकाश मंडल वय २२ वर्षे,लिपिका प्रकाश मंडल वय १८ वर्षे व पल्लवी शंकर राहा वय २७ वर्षे असे आठ सदस्य हे मार्कंडादेव येथील यात्रेनिमित्य आंघोळीसाठी गेले होते.परंतु,मार्कडा येथ न जाता सावली तालुक्याच्या सिमेवरील वैनगंगा नदी पुलाखाली आंघोळीसाठी थांबले.नदी काठावर तंबू टाकला व कुटुंबातील प्रतिमा,कविता,लिपिका,प्रथमेश व पुनम हे पाच जण गाणे लावून नाचत-नाचत पाण्यात उतरले.त्यातील पाच वर्षीय प्रथमेश हा खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला.हे दृश्य बघताच प्रथमेशला वाचविण्याच्या प्रयत्नात पाचही जण वाहून जावू लागले.प्रणव याने प्रथमेशला बाहेर काढले,तर पुनम ही पाण्यातील एका दगडाला अडकल्यामुळे बचावली. मात्र प्रतिमा,कविता व लिपिका या मंडल कुटुंबातील सख्ख्या बहिणींना वाचविण्यात यश आले नाही.या
दुर्दैवी घटनेमुळे मंडल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.प्रतिमा एम.एससी.च्या शेवटच्या वर्षात होती.कविता बी.एससी.च्या अंतिम वर्षात,तर लिपिका बी.एससी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. चंद्रपूरच्या बाबूपेठ वॉर्डातील प्रकाश मंडल वेकोली (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) मध्ये कार्यरत होते. त्यांची पत्नी गृहिणी होती.मुलगा नसल्यानेही त्यांना कधीच त्याची कमी जाणवली नाही,कारण त्यांचे संपूर्ण जीवनच त्यांच्या लेकींना घडवण्यासाठी समर्पित होते.तिन्ही लेकींना उच्च शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे केले की,त्याच आमच्या वंशाचा दिवा असे अभिमानाने सांगणाऱ्या मंडल कुटुंबात आता आई-वडिलांशिवाय कुणीही उरलेले नाही.तिन्ही लेकिंच्या मृत्यूने उरले केवळ आई-वडील.
- Advertisement -