उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आय सी एम आर जागतिक आरोग्य संघटना आणि शालेय शिक्षण विभाग यांनी आखून दिलेले तंबाखूमुक्त शाळांचे नऊ निकष अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्याने तसेच प्राधान्याने अंमलात आणावे; यासाठी सामाजिक न्याय विभाग पुरस्कृत संस्था आरोग्य प्रबोधिनीच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना साकडे घालण्यात आले आहे.
आरोग्य प्रबोधिनीचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर सूर्यप्रकाश गभने यांनी धर्मरावबाबा यांची भेट घेऊन तंबाखूमुक्त शालेय वातावरण काळाची गरज असून तंबाखू मुक्त शाळांचे निकष आणि आरोग्य प्रबोधिनीच्या वतीने शाळांमधून करण्यात येणारी जनजागृती याविषयी सविस्तर माहिती दिली आणि नऊ निकष पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी विनंती केली.आरोग्य प्रबोधिनी आणि पेस संस्थेच्या वतीने शाळांमधून व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम केले जात आहेत.तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये बालविवाह आणि बालमजुरी थांबण्यासाठी आरोग्य प्रबोधिनी संस्था कार्यरत आहे.मंत्री महोदयांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी लीलाधर भरडकर,लतीफ शेख,आरती पुराम,रिंकू पापडकर आदींची उपस्थिती होती.
तंबाखू मुक्त शाळांचे निकष काय?
1.शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखू मुक्त क्षेत्रचा फलक लावलेला असावा.
2.शाळेच्या प्रवेशद्वारावर तंबाखू मुक्त शाळा असा फलक असावा.
3.शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्या बाबतचा पुरावा नसावा.
4.तंबाखू दुष्परिणाम बाबतचे पोस्टर शाळेच्या आवारात लावलेली असावे.
5 .शाळेत सहा महिन्यातून किमान एक तंबाखूमुक्ती बाबत जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात यावा.
6.शैक्षणिक संस्था अधिकृत व्यक्ती यांचे नाव, पद, पदनाम व संपर्क क्रमांक याचा उल्लेख फलकावर असावा.
7.शैक्षणिक संस्था व परिसरात तंबाखू तथा तंबाखू जन्य पदार्थाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.असा नियम शैक्षणिक संस्थेच्या सहिते मध्ये समाविष्ट करण्यात यावा.
8.शैक्षणिक संस्थेच्या बाहय भिंतींपासून 100यार्ड हे क्षेत्र रेखांकित केलेले असावे
9 शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू तथा तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करणारे दुकानं नसावे.