उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(कोंढाळा) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील काही व्यक्ती नळाचे पाणी जास्त मिळावे व पाण्याला चांगला फोर्स यावा; यासाठी सकाळच्या सुमारास नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचण्याचा प्रकार हल्ली उघडकीस आला असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.टिल्लू पंपामुळे कोंढाळा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच ग्रामपंचायत प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.
सुरुवातीला कोंढाळा ग्रामपंचायत पदाधिकऱ्यांतर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांवर अंकुश घालण्यासाठी सकाळच्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात येत होता.मात्र काही नागरिकांनी यावर आक्षेप घेत दुसऱ्यांची करणी आमच्या माथी कशी काय मारताय? असे म्हणून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीची परवानगी घेणे आवश्यक नाही.त्यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव घेऊन ‘आमचा गाव आमचे राज्य’ असे करणे आवश्यक आहे.मात्र याठिकाणी शिकून अडाणी झाल्याचे दिसून येत आहे.टिल्लू पंप एखादा सर्वसामान्य नागरिक लावू शकतो काय? त्यांच्या नळाला पाणी न आल्यास ते केवळ बोंबाबोंब करू शकतात.टिल्लू पंप धारकांवर कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास कुणी ऐकत नसेल तर पोलीस प्रशासनास रीतसर पत्रव्यवहार करून कार्यवाही करणे आवश्यक आहे.नाहीतर सर्वच जण नळाला टिल्लू पंप लावून जलकुंभातील पाणी खेचून जलकुंभ खाली केल्याशिवाय राहणार नाहीत.यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने टिल्लू पंप धारकांवर कार्यवाही करून जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.