उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- नगर परिषद हद्दीमध्ये येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा गेली दोन महिन्यांपासून खंडित असून गावातील शेतकरी बांधवांनी कित्येकदा याबाबत देसाईगंज विद्युत वितरण कंपनी यांना माहिती देऊनही याकडे कानाडोळा केला जात असल्याने जुनी वडसा येथील शेतकरी बांधव व देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सारवे यांना कृषी पंपाचा खंडित पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा; याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
गावातील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतातील धान पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान्य पाण्याअभावी करपून गेले होते.ज्या ठिकाणी दोन पोते धान्य व्हायचे त्या ठिकाणी एकच पोते धान्य झाल्याने; याची नुकसानभरपाई कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस अनेकदा सूचना देऊनही तसेच सामूहिकरित्या निवेदने सादर करुनही बंद पडलेले मीटर तसेच खंडित पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.कार्यालयात सूचना दिल्यास चार दिवसांत वा आठ दिवसात आम्ही येऊ व दुरुस्ती करून देऊ; असे खोटे-नाटे सांगून पोकळ आश्वासने देऊन शेतकरी बांधवांची फसवणूक देसाईगंज विद्युत वितरण कंपनीद्वारे केले जात असल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.काल १२ जून २०२३ रोजी दिलेल्या निवेदनानुसार येत्या दहा दिवसांत खंडित पुरवठा सुरळीत करू; असे आश्वासन देण्यात आले.दहा दिवसांत कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास पुढील दिवसांत आमरण उपोषणाचा इशारा जुनी वडसा येथील शेतकरी बांधव व देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.